पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप
पनेवल,दि.07 : महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे 6 हजार 639 पेक्षा अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे भाक्तिमय वातावरणात नियोजनबध्द, शांततेत विसर्जन करण्यात आले.
माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणांचं पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखले जावे यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा’ ही मोहिम हाती घेतली होती. गणेशभक्तांच्या सोयी - सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग,पर्यावरण विभाग या 8 विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली होती. याकामी लायन्स क्लब पनवेल सारख्या विविध एनजीओ, सामाजिक संघटना देखील महापालिकेस सहकार्य करत होत्या.
यावर्षी महापालिकेच्यावतीने एकुण 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विर्सजन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती. या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटिव्ही स्टेज, टॉवरची सोय, टेबल खुर्च्या, लाऊड स्पीकर,निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली होती. याचबरोबर आवश्यक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी मोठ्या क्रेन व हायड्राची सोय करण्यात आली होती.
दरम्यान विसर्जन कार्यक्रम सुरळित पार पडावा यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व उपायुक्त व सहाय्यक आयुक्त ,प्रभाग अधिकारी, अग्निशमन विभाग कर्मचारी यांनी पालिकेच्या सर्व विसर्जन ठिकाणांना भेटी देऊन व्यवस्थेचे निरीक्षण करून व्यवस्थापन करत होते. अगदी शेवटच्या गणपती विसर्जनापर्यंत महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी गणेश विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी झटत होते.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन घाटांवर गणपतींचे सुव्यवस्थित विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी, मुख्यालय कर्मचारी तसेच पोलिस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक विसर्जन स्थळांवरती प्राथमिक उपचारार्थ सेवा देण्यात आली होती.
चौकट
निर्माल्यावर पर्यावरणपूरक प्रक्रिया- पर्यावरणपूरक गणेशोत्सव
पालिका क्षेत्रातील गणेश मंडळाच्या दारात जाऊन दररोज निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने विशेष ‘निर्माल्य संकलन रथ’ तयार केले होते. या निर्माल्य संकलन रथाच्या माध्यमातून दररोज निर्माल्य संकलन केले जात होते.
त्याच अनुषंगाने श्री शिव समर्थ तलाव, खारघर गाव येथे प्रभाग समिती अ खारघर मधील श्रीगणेश विसर्जनवेळी घरगुती गणेशोत्सवातील निर्माल्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे संकलन विशेष निर्मूलन संकलन रथाद्वारे करून ,हे निर्माल्य संकलन रथाद्वारे नियोजित ठिकाणी पोहोचवून त्यावर पर्यावरण पूरक प्रक्रिया राबवून खत निर्मिती करण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे तयार केलेले खत बगीचे आणि झाडांसाठी वापरण्यात येणार आहे.
चौकट
कळंबोलीतील म्हसोबा तलाव येथे मोठ्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी खास ट्रॉलीची सोय करण्यात आली होती.
कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन केलेल्या नागरिकांना महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.



