वेळीच शस्त्रक्रिया केल्याने ‘तिला‘ पुन्हा ऐकू येऊ लागले;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये केली यशस्वी शस्त्रक्रिया
*नवी मुंबई* : सर्व इंद्रियांपैकी सर्वात महत्वाचे इंद्रिये म्हणजे आपले कान. ज्यातून आपण तो आवाज आपल्या मेंदूला ऐकवतो. तेव्हाच आपला मेंदू प्रतिसाद देतो. असेही बरेच लोक आहेत ज्यांना कानातून ऐकण्याची किंवा श्रवणशक्ती कमी होण्याची समस्या आहे. अशाच एका प्रकरणात खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलचे ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला यांच्या नेतृत्वाखाली टिमने एका ३४ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करत तिची श्रवणशक्ती परत मिळाली असून रुग्णाला कामाच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या संघर्षाला पूर्ण विराम मिळाला आणि तिच्या वैवाहिक जीवनातला आनंदही परतला आहे.
खारघर येथील ३४ वर्षीय दीपिका गाला (नाव बदलले आहे)* हिला ओटोस्क्लेरोसिसचे निदान झाले, जी एक आनुवंशिक स्थिती असून कानाच्या आतील हाडांच्या जास्त वाढीमुळे बहिरेपणाची समस्या उद्भवते. वर्षानुवर्षे श्रवणयंत्रांचा वापर केल्यानंतर अखेर तिच्यावर स्टेपेडोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली, जिथे एका लहान ३.७५ मिमी टेफ्लॉन पिस्टन इम्प्लांटने तिची श्रवणशक्ती पुनर्संचयित करण्यात आली. आज तिला अगदी स्पष्ट ऐकू येत असून तिच्या वैयक्तिक जीवनातील आनंदाचे क्षण परतले आहेत.
दोन वर्षांपूर्वी दीपिका गाला (नाव बदलले आहे)* (३४ वर्षे) हिला श्रवणशक्ती कमी झाल्याची लक्षणे जाणवू लागली. साध्या संभाषणांमध्ये देखील तिचा गोंधळ उडणे तसेच कामाच्या ठिकाणी तिला संघर्ष करावा लागत होता. कधीकधी तर तिला तिच्या कानात सतत काहीतरी वाजतंय असं अनुभव येऊ लागला, ज्यामुळे ती अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाली. जरी तिला यामुळे जास्त वेदना होत नसल्या तरी स्पष्टपणे ऐकू न येणे हे तिच्या एकटेपणाचे कारण ठरत होते.
जेव्हा ती उपचाराकरिता मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या ज्यात तिच्या कानातील श्रवणशक्ती कमी झाल्याचे आढळून आले. त्यावेळी तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु तिने ते मनावर न घेता त्याऐवजी श्रवणयंत्रांचा वापर करण्याता निर्णय घेतला. या उपकरणांमुळे तिला तात्पुरता दिलासा मिळाला मात्र, तिला अजूनही स्पष्ट ऐकू येत नव्हते आणि या उपकरणांमुळे तिला तिच्या सहकाऱ्यांसमोर अस्वस्थ वाटू लागले, ज्यामुळे आत्मविश्वास खालावल्याने त्याचा कामावरही परिणाम झाला.
गेल्या वर्षी तिचे लग्न झाले, मात्र लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षात घरातील तणाव वाढू लागला. स्पष्टपणे ऐकू न येण्यामुळे पती आणि सासरच्या लोकांमधील गैरसमज वाढत गेले. रोजची संभाषणं वादात बदलू लागली कारण ती अनेकदा योग्य वेळी योग्य प्रतिसाद देऊ शकत नव्हती. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. त्यानंतर ती पुन्हा मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये परतली व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
मेडिकव्हर हॉस्पिटलचे कन्सल्टंट ईएनटी आणि एंडोस्कोपिक सर्जन डॉ. राजेंद्र वाघेला सांगतात की, या दोन वर्षात हळूहळू तिची श्रवण क्षमता कमी कमी होत गेली. ओटोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे जिथे मधल्या कानातील स्टेप्स हाड स्थिर होते आणि आतील कानात आवाज प्रसारित करण्यात अयशस्वी होते. ओटोस्क्लेरोसिस हे भारतात बहिरेपणाचे एक सामान्य कारण आहे, बहिरेपणा आणि कानाचा पडदा अखंड असलेल्या रुग्णांमध्ये असे ९.२% रुग्ण आढळतात.
रुग्णाच्या आईलाही अशीच समस्या होती आणि २ वर्षांपूर्वी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तिची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ओटोस्क्लेरोसिसमध्ये ही एक अनुवांशिक स्थिती असून जर एका पालकाला ओटोस्क्लेरोसिस असेल तर त्यांच्या बाळाला तो होण्याची शक्यता २५% इतकी असते. जर दोन्ही पालकांना ओटोस्क्लेरोसिस असेल तर हा धोका ५०% पर्यंत वाढतो. हार्मोनल बदलामुळे ओटो स्क्लेरोसिस असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेमुळे देखील श्रवणशक्ती कमी होऊ शकते.
डॉ. वाघेला पुढे सांगतात की, या शस्त्रक्रियेला स्टेपेडोटोमी असे म्हणतात आणि ती सर्वात नाजूक सूक्ष्म शस्त्रक्रिया पैकी एक आहे. ती या प्रक्रियेसाठी योग्य होती कारण तिची श्रवणशक्ती खुप कमी झाली होती व शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी स्टेप्स हाडात एक लहानसे छिद्र पाडून केवळ 3.75 मिमी (3.5 ते 5 मिमी पर्यंत) पिस्टन प्रोस्थेसिस बसवणे गरजेचे आहे. खूप लहान आकाराचा पिस्टन श्रवणशक्ती पुनर्संचयित करू शकत नाही, तर खूप लांब असा पिस्टनमुळे चक्कर येऊ शकते. परंतु ही प्रक्रिया अचूकपणे पार पाडल्यास त्याचे परिणाम उत्तम आहेत. रुग्णाच्या श्रवणशक्तीत लक्षणीय सुधारणा झाली आणि तिला आता कोणत्या यंत्राची देखील आवश्यकता भासत नव्हती. ही प्रक्रिया सुमारे एक तास चालली आणि रुग्णाला दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात आले. योग्य वेळी शस्त्रक्रिया न केल्यास श्रवणशक्तीची समस्या आणखी वाढली असती. आज या रुग्णाने श्रवणयंत्रांचा वापर पूर्णपणे बंद केला आहे आणि ती या शस्त्रक्रियेच्या परिणामांमुळे खूप आनंदी आहे.
पूर्वी मला साधे संभाषण ऐकू येत नसल्याने मला अस्वस्थ वाटायचे. बऱ्याचदा मी काही चुकीचे बोलेल की काय याची भीती वाटत होती. मी योग्य वेळी प्रतिसाद न दिल्याने बऱ्याच लोकांना वाटायचे की मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. हळूहळू मी चारचौघात जाणे टाळू लागली. मात्र जेव्हा मी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉ. राजेंद्र वाघेला यांची भेट घेतली त्यानंतर मात्र माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली अशी प्रतिक्रिया रुग्ण दीपिका गाला (नाव बदलले आहे)* यांनी व्यक्त केली.
