नवी मुंबई महानगरपालिकेत सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम
सार्वजनिक ठिकाणी भिंती, पदपथ यांच्या कॉर्नरवर थुंकण्याच्या नागरिकांच्या सवयींमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्याकडेही व नागरिकांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये आज रेड स्पॉट निर्मूलन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या अभियानामध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे यांच्या माध्यमातून विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व सार्वजनिक जागी रेड स्पॉट स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
यामध्ये ठिकठिकाणी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचे पोस्टर्स दाखवून नागरिकांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कुठेही न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच तशा प्रकारच्या रेड स्पॉटची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अंतर्गत नेरुळ विभागात बसडेपो ते रेल्वे स्टेशन परिसरातील रेड स्पॉटची पाणी मारून सफाई करण्यात आली. सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी श्री. अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
तुर्भे विभागातही सेक्टर 26 कोपरी परिसर आणि जनता मार्केट परिसरात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
घणसोली विभागातही सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांच्या माध्यमातून घणसोली रेल्वे स्टेशन परिसर, रिक्षा स्टँड, पानटपरी याठिकाणी सेक्टर 1 ते 3 परिसरातील रेड स्पॉटवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.
ऐरोली रेल्वे स्टेशन व परिसर 3 याठिकाणी सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रेड स्पॉट स्वच्छता मोहीमेत नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला. रेल्वे स्टेशन्सवरील स्वच्छतेमध्ये सिडकोमार्फत रेल्वे स्टेशन्स सफाईसाठी नियुक्त स्वच्छताकर्मीही सहभागी झाले होते. इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहा.आयुक्त व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

