"नाच गं घुमा पनवेल" तर्फे मंगळागौरीचा जल्लोषात कार्यक्रम
पनवेल (प्रतिनिधी ) श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी "नाच गं घुमा पनवेल" या महिलावर्गीय सांस्कृतिक मंडळातर्फे एक आगळावेगळा मंगळागौरीचा कार्यक्रम पनवेलमधील दास मारुती मंदिर येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात पनवेलमधील विविध महिलामंडळांना आमंत्रित करून पारंपरिक खेळ, उखाणे, प्रश्नमंजुषा, आणि सांस्कृतिक स्पर्धांद्वारे श्रावण साजरा करण्यात आला. सततच्या पावसाचं आव्हान झुगारून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, एक घरकाम करणाऱ्या महिलेला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करून तिच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही स्तुत्य कल्पना उपस्थितांनी विशेषत्वाने गौरवली.
कार्यक्रमामध्ये फुगड्या, झिम्मा, किकीचं पान, दिंड्या यांसारखे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यावेळी "दीपक साडी स्टोअर" प्रायोजित उखाणे स्पर्धा आणि "वेदा आर्ट" प्रायोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.विजेत्यांना साड्या, नथ यांसारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच, विशेष आकर्षण ठरली ती "श्रावण क्वीन" स्पर्धा, ज्यात वेशभूषा, खेळातील सहभाग व उत्साहावरून तीन महिलांना गौरवण्यात आले. सर्व उपस्थित महिलांना "अंकित ज्वेलर्स" तर्फे एक खास भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगतेस स्वादिष्ट अल्पोपहाराने महिलांनी मनमुराद आनंद लुटला. "नाच गं घुमा" ग्रुपच्या सख्यांनी उत्तम आयोजन करत पनवेल परिसरातील महिलांना श्रावणाचा उत्सवप्रसंग मोठ्या आनंदात साजरा करण्याची संधी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दास मारुती मंदिर ट्रस्ट, प्रायोजक संस्था आणि सहभागी महिलामंडळांचे विशेष आभार मानण्यात आले. संस्कृती जपत पुढे जाण्याचा निर्धार करत, "नाच गं घुमा पनवेल" ग्रुपकडून अशाच अनेक उपक्रमांची घोषणा लवकरच होणार आहे.

