नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 12 जिल्हयातील 28 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न
‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ प्रक्रीयेला आजपासून सुरुवात झाली असून दि.16,17,18,19 जुलै रोजी दररोज तीन सत्रांमध्ये ऑनलाईन स्पर्धा परीक्षा संपन्न होत आहेत. आज परीक्षेच्या पहिल्या दिवशी 12 जिल्हयांमधील 28 केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा सुरु झाली.
सदर परीक्षा प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. गट - क आणि गट - ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरिता 84,774 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. उमेदवारांना परीक्षा देणे सोयीचे जावे याकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 1 श्रेणीच्या नमुंमपा अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तसेच 29 अधिकाऱ्यांची केंद्र निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 जुलै रोजीच आपणास नेमून दिलेल्या जिल्हयांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली.
आज सकाळी ठिक 9.00 वाजता सर्व 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षेस नियोजन केल्याप्रमाणे वेळेवर सुरुवात होऊन आजच्या दिवसातील तिन्ही सत्रांमधील परीक्षा प्रक्रीया व्यवस्थित पार पडली.
सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 7898 उमेदवारांनी परीक्षा दिली.
दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 7009 उमेदवारांनी परीक्षा दिली.
सायं. 5 ते 7 वा. या तिसऱ्या सत्रात 6608 उमेदवारांनी परीक्षा दिली.
अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतील पहिल्या दिवशी 21515 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
पहिल्या दिवसाची परीक्षा प्रक्रीया सुरळीतपणे पार पडली असून यापुढील तिन्ही दिवसांच्या परीक्षा प्रक्रीयेचे अशाच प्रकारे सुयोग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासन विभागाचे उपआयुक्त् श्री.शरद पवार यांनी दिली.
परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पाठविण्यात आली असून त्यांनी ती डाऊनलोड करुन घ्यावीत व आपले प्रवेशपत्र घेऊन परीक्षा स्थळी प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रात नमूद वेळेवर उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना नियमानुसार परीक्षेस बसता येणार नाही याची प्रत्येक उमेदवाराने गांभिर्यपूर्वक नोंद घ्यावयाची आहे.
*नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार काटेकोरपणे होत असून उमेदवारांनी नोकरी मिळवून देण्यासाठी कोणी कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्यास दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेविषयी अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.*
