बिंदास बारमध्ये छम छम सुरू, नऊ जणांविरोधात गुन्हा
नवीन पनवेल : कोन येथील बिंदास बार आणि ऑर्केस्ट्रा मध्ये महिला सिंगर ग्राहकां सोबत अंगविक्षेप करून बीभत्स वर्तन करताना मिळून आल्या. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी बारचे मॅनेजर, पुरुष वेटर आणि महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.
पनवेल परिसरातील लेडीज बारमुळे पनवेलचे नाव यापूर्वीच बदनाम झालेले आहे. अनेकदा पोलिसांच्या कारवाया होत असल्या तरी देखील बार चालक आणि मालक कारवायांना घाबरत नसल्याचे दिसत आहे. बारचे परवाने रद्द करून देखील या ठिकाणच्या बारमध्ये अनेकदा अश्लीलता पहावयास मिळते. नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री पनवेल तालुका पोलिसांनी बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई केली. हॉटेल बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रा येथे ग्राहकांच्या मनोरंजनाकरता ऑर्केस्ट्रा वरील संगीताच्या तालावर अंग प्रदर्शन आणि अश्लील हावभाव सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी म्युझिक च्या तालावर सार्वजनिक रित्या गैरवर्तनशील हावभाव कृत्य सुरू असल्याचे दिसून आले. एक जानेवारी रोजी अडीचच्या सुमारास सहा महिला सिंगर यांनी भडक वेशभूषा करून माइक वर गाणे गाऊन ग्राहकांशी लगट आणि अंगविक्षेप करून बीभत्स वर्तन करताना मिळून आल्या. आणि या बारचे मॅनेजर प्रदीप कुमार नायर आणि पुरुष वेटर यांनी आर्थिक फायद्यासाठी त्यांना परवानगी व उत्तेजन दिले.
पनवेल, नवी मुंबई येथील सर्वच बारमध्ये अश्लीलता पाहायला मिळते. पोलिसांकडून वारंवार कारवाई करून देखील बार चालक आणि मालक येथील महिला सिंगर कडून अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून घेतात. येथील क्रेझी बॉईज बारमध्ये प्रेम संबंधातून दोन महिन्यांपूर्वी गोळीबाराची घटना देखील उघडकीस आली होती. गुन्हेगारी आणि अश्लीलता वाढत असल्याने या बारचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
चौकट
डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होते. यावेळी मात्र वेळेत नवी मुंबई, पनवेल येथील बार बंद व्हायचे आणि अश्लीलतेवर लगाम घालण्यात आला होता. मात्र अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी छम छम सुरू झाले असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे. पनवेल शहर, कोनगाव, तळोजा, खांदा कॉलनी, कळंबोली, नवी मुंबई या ठिकाणच्या लेडीज बारमध्ये अश्लीलतेचा कहर पहावयास मिळतो. त्यामुळे पुण्यावरून आंबटशौकीन या ठिकाणी येत असल्याचे समोर आले आहे.
उत्पादन शुल्क विभाग देखील या बारवर कारवाई करू शकते व या बारचा परवाना रद्द करू शकतो. मात्र ते कारवाई करत नसल्याने बार चालकांचे चांगलेच फावले आहे.