ऐरोली विभागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या 06 व्यावसायिकांकडून 30 हजार रुपयांची दंड़ वसूली
नवी मुंबई-स्वच्छ सर्वेक्षणातील एक महत्वाचा भाग म्हणजे निसर्गाला हानीकारक असणा-या एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे हा असून यादृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे.
पर्यावरण प्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा धोका ओळखून प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळावा तसेच पर्यायी कापडी व कागदी पिशव्यांचा प्राधान्याने वापर करावा याविषयी महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापरास खीळ बसावी यादृष्टीने धडक कार्यवाही करण्यात आली.
अशा प्रकारची प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कार्यवाही परिमंडळ – 2 उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या सूचनेप्रमाणे ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांनी केली असून ऐरोली कार्यक्षेत्रातील प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 06 व्यापारांकडून रुपये तीस हजार इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच तीन किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे.
ऐरोली कार्यक्षेत्रातील सेक्टर 3, सेक्टर 19 व सेक्टर 20 येथील दुकानांना अचानक भेट देत तपासणी केली असता 6 दुकानदारांमार्फत प्लास्टिक पिशव्यांचा व प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या वापर सुरु असल्याचे अढळले. त्यानुसार ऐरोली विभाग कार्यालयाच्या पथकाने सेक्टर 3 येथील टिपीकल मालवणी, शिव उपहारगृह, श्रीगणेश आहार केंद्र तसेच सेक्टर 20 येथील शंकर फास्ट फूड, अंजली स्नॅक्स सेंटर आणि सेक्टर 19 येथील माजीसा डेकोरेटर्स या दुकानांवर कारवाई करत रुपये पाच हजार दंडात्मक रक्कम वसूल केली.
या कार्यवाहीमध्ये सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या नियंत्रणाखाली अधिक्षक / वसूली अधिकारी श्री. कृष्णा खैरनार, वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक श्री. गणेश जगले, लिपिक श्री. कल्पेश पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. नितीन महाले आणि जी विभाग ऐरोली विभागातील अधिकारी/ कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांचेमार्फत करण्यात आली.