नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून घडणाऱ्या नुकसानीची पुनरावृत्ती होवू नये,यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून घडणाऱ्या नुकसानीची पुनरावृत्ती होवू नये,यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर



अलिबाग,दि.21(जिमाका) :- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प व राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत शासनास सादर करावयाच्या प्रस्तावांबाबतची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.

      यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी,महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी,पेण विठ्ठल इनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच इतर शासकीय विभागांचे विभाग तसेच कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

      या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड जिल्हा हा बहुआपत्ती प्रवण जिल्हा असून जिल्ह्याची आपत्ती प्रवणता लक्षात घेता आपत्ती सौम्यीकरणाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपआपल्या स्तरावर स्थानिक नैसर्गिक परिस्थितीची इत्यंभूत माहिती घ्यावी. मागील काही वर्षातील उद्भवलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करावा आणि त्याआधारे भविष्यात नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून घडणाऱ्या नुकसानीची पुनरावृत्ती होवू नये, यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. हे प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील. 

      हे प्रस्ताव शासनास कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत सादर करण्यात येणार असून यात मुख्यत: खार प्रतिबंधक बांध प्रकल्प, धूप प्रतिबंधक बंधारा प्रकल्प, बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमीगत विद्युत वाहिनीकरण,  संरक्षक भिंती उभारणे, क्राँक्रीट गटारे बांधणे, मोबाईल टॉवर उभारणे, वीज प्रतिरोधक यंत्र कार्यान्वित करणे, साकव दुरुस्ती करणे, सोलार हायमास्ट उभारणे, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करणे व त्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, पूर्व चेतावनी प्रणाली व पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टम कार्यान्वित करणे, अशा विविध उपाययोजना आपत्ती सौम्यीकरणाच्या अनुषंगाने प्रस्तावित केल्या जाणार आहेत.

      प्रत्येक शासकीय विभागाने रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रवणता लक्षात घेता आपत्ती सौम्यीकरणाच्या अनुषंगाने अतिशय गांभीर्याने लक्ष देवून मनुष्य व वित्तहानी होणारच नाही, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल, असेही ते शेवटी म्हणाले.