सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर मतदान नोंदणी आणि जातीच्या दाखल्यांचे वाटप
अलिबाग,दि.28 (जिमाका):- प्र.कोकण विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आदिवासी समाजासाठी सुरू असलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव आणि पनवेल महसूल विभाग यांच्या सहकार्याने उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून (रविवार,दि.27 नोव्हेंबर 2022) रोजी पनवेल तालुक्यातील पोयांजे विभागातील पोयांजे कातकरी वाडी, भेरले वाडी, खानावले वाडी, पाली बुद्रुक वाडी, भिंगार वाडी आणि इतर आदिवासी लोकांना जातीच्या दाखल्यांचे वाटप तसेच सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत 18 वर्ष पूर्ण झालेल्यांचे मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले आणि मतदानासाठी आवश्यक इतर नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली.
यावेळी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी यांनी प्रभारी कोकण विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, पनवेल तहसिलदार विजय तळेकर तसेच महसूल विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प पेण या कार्यालयातील सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास तहसिलदार पनवेल विजय तळेकर, नायब तहसिलदार श्री.नाईक, मंडळ अधिकारी प्रभाकर नाईक, तलाठी श्रीमती सावंत, कोतवाल प्रकाश पडवळ, योगेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पोयांजे ग्रामपंचायत सरपंच, अंगणवाडी सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.