जिल्ह्यात ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी परवानगी आदेश केले जारी
*अलिबाग,दि.17(जिमाका):-* शासन निर्णयान्वये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम, 2000 च्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र शासनाच्या दि.10 ऑगस्ट 2017 रोजीच्या अधिसूचनेव्दारे ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) 2017 च्या सुधारीत नियमावलीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करण्याची परवानगी आदेश जारी करण्यात आला आहे.
*सूट द्यावयाचे दिवस-* शिवजयंती- 1 दिवस, ईद-ए-मिलाद- 1 दिवस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती- 1 दिवस, होळी पोर्णिमा- 1 दिवस, गणपती उत्सव-4 दिवस (दुसरा व पाचवा दिवस आणि गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी), नवरात्र उत्सव-3 दिवस (पंचमी, अष्टमी व नवमी), दिवाळी- 2 दिवस (बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन), ख्रिसमस-- 1 दिवस, 31 डिसेंबर- 1 दिवस,
याप्रमाणे ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट ही राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. प्रकरणी ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील तरतूदीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 19 (अ) नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कळविले आहे.