आर.के.एफ शाळा हटविण्याचा सूर ; शाळेच्या बेबंदशाहीत विद्यार्थी वाऱ्यावर
शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी जेएनपीटी प्रशासनाला धारेवर धरू : आ. बाळाराम पाटील
. शिक्षक आणि पालकांच्या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत सोबत राहून न्याय मिळवू : मनोहरशेठ भोईर
पनवेल : जेएनपीटी येथील आर.के.फाउंडेशनच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळेच्या कारभाराविरोधात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांकडून कडाडून विरोध होत आहे, गेली दोन वर्षे या लढ्यात न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला असला तरी मात्र आर.के.फाउंडेशनने न्यायालयाच्या निकालाचा अवमान करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांवरील अन्याय सुरूच ठेवला आहे. गतवर्षी ६ शिक्षकांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आल्यानंतर आता तर शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा घरी बसविण्याचा प्रकार केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ गेले दोन दिवस जेएनपीटी टाऊनशिप येथे शिक्षकांसह कर्मचारी आणि पालकांनी शाळेच्या गेटवर बेमुदत आंदोलन सुरु केले. यावेळी उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षकांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहून जेएनपीटी प्रशासनाला धारेवर धरणार तसेच शिक्षक आणि पालकांच्या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत सोबत राहून न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान जेष्ठ समाजसेवक प्राध्यापक एल,बी.पाटील यांनी आर.के.फाउंडेशनच्या व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले आहेत. यावेळी शिक्षक नेते नरसू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले.
जेएनपीटी येथील इंडीयन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गेले ३० वर्षे या शाळेचे योग्यरीत्या काम सांभाळले. त्यावेळी जेएनपीटी प्रशासन हे शाळेला उत्तम प्रकारे आर्थिक सहकार्य करीत होते. मात्र आर.के.फाउंडेशनने व्यवस्थितरीत्या सुरु असलेल्या शाळेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाकडे गळ घातली. काही आर्थिक हितसंबंध जपत जेएनपीटीमार्फत शून्य बजेट तत्वावर शाळा चालवण्याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी इंडियन एज्युकेशन सोसायटीला शून्य बजेटवर शाळा चालविणे म्हणजे पालकांच्या डोक्यावर अधिभार द्यावा लागणार होता. म्हणून शाळेने शून्य बजेटवर शाळा चालविण्याच्या निघालेल्या निविदेला विरोध केला.
मात्र या साऱ्या प्रकारात मुंबईतील आर.के.फाउंडेशनने आपला स्वार्थ साधून शून्य बजेटवर शाळा चालविण्यासाठी निविदा भरली आणि जून २०१९ मध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता आर.के.फाउंडेशनने बेकायदेशीररीत्या शाळेचे हस्तांतरण करण्यासाठी धडपड सुरु केली. असे असतानाही आजपर्यंत हस्तांतर न होता शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर बेबंदशाहीची हुकूमत करीत अन्याय सुरु केल्यामुळे अखेर या शाळेतील याविरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकांच्या सहकार्याने न्यायालयात गेले, तिथे शिक्षकांना न्यायालयाकडून न्याय मिळाला, मात्र आर.के.फाउंडेशनच्यावतीने न्यायालयाच्या या आदेशालाच तिलांजली वाहण्यात आली. टावूनशिप येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन शाळा प्रशासनाला जागा दाखविण्यासाठी अखेर पालकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेच्या गेटवर बेमुदत आंदोलन सुरु करावे लागले.
रुस्तमजी केरावाला फाउंडेशन यांनी नियमांची पायमल्ली करून शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांना रस्त्यावर आणले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जेएनपीटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग गेली २५ वर्ष शाळेचा यशस्वी कारभार सांभाळत आहेत. मात्र आर.के.फाउंडेशनच्या हिटलरशाही कारभारामुळे त्यांच्याही नोकरीवर गदा आली आहे. आर.के.फाउंडेशनने अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत. अखेर शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यावर झालेल्या अन्यायांच्याविरोधात जेएनपीटी येथील टाऊनशिप परिसरात असलेल्या आर.के.फाउंडेशनच्या व्यवस्थापकांविरोधात तसेच जेएनपीटी व्यवस्थापक यांच्याविरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार असल्याची भावना यावेळी शिक्षक आणि पालकांमधून व्यक्त करण्यात आली.