मुंबई हिवाळी अधिवेशन २०२१- 'मग दोनदा पंचनामा का केला' - आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल

 

मुंबई हिवाळी अधिवेशन २०२१


  'मग दोनदा पंचनामा का केला' - आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकारला सवाल 



पनवेल(प्रतिनिधी) महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा दिनांक २२ व २३ जुलै २०२१ महापुरामध्ये खराब झाला असल्याचे निदर्शनास आले असून शासकीय गोदामातील धान्य वितरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दाखल केला होता. हा प्रश्न आज सभागृहात उपस्थित केला. 
        नवेनगर गोदामातील भिजून खराब झालेल्या धान्य साठ्याचा पंचनामा केला असता रेकॉर्डमधील नोंदीपेक्षा २०० ते ३०० जादा धान्याची पोती आढळून आली, हे खरे आहे का तसेच संबधीत विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच अन्नधान्याचे नियमित वितरण न केल्यामुळे गोदामातील धान्य भिजून खराब झाले, हि बाब खरी आहे काय? असाही सवाल यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला होता. 
         या प्रश्नावर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या उत्तरात म्हंटले कि,  महाड शहरातील नवेनगर येथील शासकीय गोदामातील धान्यसाठा दिनांक २२ व २३ जुलै २०२१ महापुरामध्ये खराब झाल्याचे अंशतः खरे आहे. दिनांक २२ व २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर दिनांक २४ जुलै २०२१ रोजी पाहणी करून गोदामाचा प्राथमिक पंचनामा दि. २६ जुलै २०२१ रोजी करण्यात आला आहे. त्या पुरात नवेनगर, महाड येथील गोदामात ५ ते ६ फूट पाणी जाऊन सरासरी ९ थरापर्यँत गोदामातील धान्य भिजून खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे.असे उत्तर देतानाच पंचनाम्याअंती पुराच्या आधीच्या साठ्यापैकी जे धान्य खराब झाले त्याची आकडेवारी व शिल्लक साठ्याची आकडेवारी पाहता असे झाल्याचे आढळून येत नाही. असे उत्तर नामदार छगन भुजबळ यांनी दिले आणि ते उत्तर विसंगत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी 'मग दोनदा पंचनामा का केला' असा प्रतिसवाल केला. त्यावर नामदार छगन भुजबळ यांनी या गोदामातील ६१६ क्विंटल तांदूळ व १०८ क्विंटल गहू वितरण योग्य असे आढळून आले असून खराब झालेले धान्य खाण्यायोग्य आहे का याची तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविण्यात आला होता पण तो मनुष्य व प्राणी या दोघांच्या खाण्यायोग्य नसल्याने खतासाठी कृषी विभागाकडे दिले आहे. असे सभागृहात सांगितले.