पनवेल महानगरपालिका पनवेल स्वच्छता स्पर्धा 2022 जाहीर आवाहन
पनवेल(प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये स्वच्छता विषयक जास्तीत जास्त माहिती, शिक्षण प्रसार,व जनजागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत टाकाऊतून टिकाऊ, स्वच्छ गृहनिर्माण संस्था/शाळा/रूग्णालये/’शासकीय कार्यालये/बाजारपेठा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल यांनी यावेळी केले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत ‘पनवेल स्वच्छता स्पर्धांचे’ आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी आज महापौर दालनात महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, मा.उपमहापौर जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, चारही प्रभाग समितीचे सभापती, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग समिती अधिकारी यांच्या उपस्थितत ही बैठक घेण्यात आली.
स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये स्वच्छतेबाबतचे मानांकानात वाढ व्हावी यासाठी या सर्व नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण, तसेच प्रक्रिया स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच यामध्ये सातत्य् ठेवून रहिवाशांच्या सवीयीमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने शहरातील गृहनिर्माण संस्था/शाळा/रूग्णालये/’शासकीय कार्यालये/बाजारपेठा यांनी या मोठ्या संख्येने या स्वच्छता स्पर्धेत सहभाग घ्यावा. पालिका क्षेत्राचा स्वच्छतेचा दर्जा वाढवा यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केले. ही स्पर्धा येत्या 25 डिसेंबर पासून सूरू होणार असून नागरिकांना यामध्ये 10 जानेवारी 2022 पर्यत नाव नोंदणी करता येणार आहे. प्रभाग समिती कार्यालय, महापालिका मुख्यालयातील घनकचरा आणि आरोग्य विभागात नागरीकांनी नाव नोंदणी करावी. येत्या 26 जानेवारीला या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्ती पत्रक, मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.