खारघर सेक्टर-१५ मध्ये रेडीमिक्स प्लांटच्या कंपनीचा सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ-महापालिकेची थातूर मातूर कारवाई

खारघर सेक्टर-१५ मध्ये रेडीमिक्स प्लांटच्या कंपनीचा सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ-महापालिकेची थातूर मातूर कारवाई



खारघर (प्रतिनिधी)-खारघर सेक्टर-१५ मधील नागरी आरोग्य केंद्रासमोरील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरती भाडेतत्त्वावरती बांधकाम व्यावसायिकांना रेडीमिक्स सप्लाय करणारी कंपनी कार्यरत असून या ठीकाणी शेकडो कामगार वास्तव्यास आहेत.त्या कामगारांच्या रोजच्या वापरासाठी या कंपनीने २५ ते ३० शौचालये बांधली असून या शौचालयाच्या टाक्या ओव्हरफ्लो होत आहेत.

        या मलमुत्राची विल्हेवाट ही व्यावसायिक कंपनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरकुल-स्पॕगेटी तसेच वास्तु-विहारमधील गटारामध्ये खुलेआम सोडून लावते.बाजूलाच विब्ग्योर आणि डी.ए.व्ही.स्कुल तसेच या परिसरात जवळपास २० ते २५ हजार लोक राहतात.या सर्वांच्या आरोग्याशी ही कंपनी खेळ करीत आहे.हा अक्षम्य गुन्हा असून कंपनीच्या व्यवस्थापनाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाच्या नियमांनुसार हा प्लांट नागरी वस्तीमध्ये सुरू ठेवता येत नसताना सुद्धा बिनदिक्कत सुरू आहे.

       पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी श्री.जितू मढवी आणि त्यांच्या पथकाने या कंपनीची मलवहातुक करणारी मोटर आणि पाईप जप्त करण्याची कारवाई केली आहे.पण ती अगदीच थातूर-मातूर असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून या कंपनीवरती दंडात्मक कारवाई करून हा प्लांट नागरी वस्तीतून इतरत्र हलविणे गरजेचे आहे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.