पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी


पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी



अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका)- पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस स्मृतीदिन कार्यक्रम  संपन्न झाला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पोलीस शहीद स्मारकास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली. 

      यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह)जगदीश काकडे, अलिबाग उप विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

     या स्मृतीदिनानिमित्त सन 2020-2021 मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या 377 शहीद पोलिसांना आदरांजली म्हणून पोलीस हुतात्मा स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

     यावेळी  उप विभागीय पोलीस अधिकारी  किरणकुमार सूर्यवंशी आणि  सोनाली कदम यांनी वीरगती प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन केले. 

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार दिनेश बिर्जे यांनी केले. यावेळी 18 पोलीस अधिकारी व 109 पोलीस अंमलदार हजर होते. 

      हुतात्मा परेड करिता परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय दशरथ हाटकर तसेच 45 एकूण पोलीस जवान, पोलीस बॅड पथक यांनी  मानवंदना दिली.