‘ठाकूर इन्फ्रा’ला काम मिळाल्याचे कोणाला आश्चर्य का वाटावे?-पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सवाल

 ‘ठाकूर इन्फ्रा’ला काम मिळाल्याचे कोणाला आश्चर्य का वाटावे?-पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सवाल



पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते कामाचे कंत्राट ठाकूर इन्फ्राला दिल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे आणि कोणाच्याही भुवया उंचावण्याचे काय कारण, असा प्रश्न महापालिकेचा सभागृह नेता म्हणून आणि स्थायी समितीचा सदस्य या नात्याने मला पडला आहे, तसेच मी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा डिसेंबर 2016मध्ये दिला असून नगरसेवकपदाची निवडणूक त्यानंतर मे 2017 साली लढविली, ही बाबही माझ्या या निवेदनातून मी स्पष्ट करीत आहे, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटले आहे.
एका दैनिकाच्या पुरवणीत मंगळवार, दि. 14 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीबाबत परेश ठाकूर यांनी हे निवेदन त्या वृत्तपत्राला दिले असल्याचे त्यांनी ‘राम प्रहर’शी बोलताना सांगितले. पनवेल महापालिकेचे काम भाजपच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे. स्टँडिंग कमिटीची ‘अंडरस्टँडिंग’ कमिटी होऊ नये याची खबरदारी आम्ही घेत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हे निवेदन केले आहे. महापालिकेच्या कामाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नाला आळा घालण्यासाठी मी ही माहिती देत आहे, असे परेश ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत रोहिंजण येथील 24 मीटर रूंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटार बांधणे, तलावावर पुलाचे बांधकाम करणे या कामाचा ठेका ठाकूर इन्फ्रा कंपनीला देण्यात आला आहे. या बैठकीला स्थायी समितीचा सदस्य म्हणून मी उपस्थित होतो, मात्र सदर कंपनीचा मी भूतपूर्व संचालक असल्याने अतिरिक्त खबरदारी घेऊन या विषयावर झालेल्या चर्चेत मी कोणत्याही प्रकारे सहभाग घेतला नाही, असेही परेश ठाकूर यांनी सांगितले.
सदर वृत्तपत्राच्या बातमीतही मी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचे म्हटले आहे, मात्र तरीही ‘पनवेल महापालिकेत सारेच आलबेल नसल्याची चर्चा पालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे,’ असे या बातमीत म्हटले आहे. या वाक्यामुळे महापालिकेबाबत त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला नेमके काय सुचवायचे आहे याचा बोध मला होत नाही. ठाकूर इन्फ्रा ही कंपनी नामांकित आणि सुप्रसिद्ध असल्याने या कंपनीला मिळालेल्या 24 कोटी रुपयांच्या कंत्राटाबद्दल कोणी आश्चर्य व्यक्त करू शकते हीच आश्चर्याची बाब आहे, असेही परेश ठाकूर म्हणाले.
ठाकूर इन्फ्रा ही कंपनी माझ्या कुटुंबीयांशी संबंधित आहे. माझे वडील रामशेठ ठाकूर हे या कंपनीचे संस्थापक आणि सल्लागार असल्याचा उल्लेखही या बातमीत त्या वृत्तपत्राच्या वार्ताहराने केला आहे. ही कंपनी म्हणजे कंपनी अ‍ॅक्टनुसार चालणारी संस्था आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांशी संबंधित कंपनीने टेंडर भरूच नये, असे त्या वृत्तपत्राच्या वार्ताहराला सुचवायचे आहे का, असा प्रश्न मला पडल्याचे परेश ठाकूर पुढे म्हणाले.
स्थायी समितीच्या या बैठकीला उपस्थित विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही मौन धारण केल्याचे या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. कारण इतर चार कंपन्यांच्या तुलनेत ठाकूर इन्फ्रा या कंपनीने 10 टक्के कमी दराने निविदा भरली होती. या कंपनीचा कामाचा दांडगा अनुभव असून कामासंदर्भातील सर्व संबंधित आवश्यक कागदपत्रांचीही पूर्तता या कंपनीने केलेली होती, तसेच कामांची हमीसुद्धा या कंपनीने पालिकेला दिली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेने या कंपनीचा दर कमी असल्यानेच विरोधी पक्षानेही या विषयावर विरोधी मत व्यक्त केले नसावे, असे मत परेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या समितीची विषयपत्रिका आणि बैठकीचे निमंत्रण या बाबी थेट माझ्या अखत्यारीत येत नसल्याने त्याबाबत या वृत्तपत्राच्या वार्ताहराने महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला तर त्यांना या ऑनलाइन बैठकीच्या बाबतची माहिती मिळू शकते. यासाठी सभागृह नेता म्हणून मीही हवे ते सहकार्य देऊ शकतो, मात्र टेंडरचा संबंध जोडून एका परीने माझी हकनाक बदनामी करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे दिसून आल्याने मी हा खुलासा संबंधित वृत्तपत्राकडे केला आहे. हे वृत्तपत्र नामांकित असून माझ्या या निवेदनाला ते प्रसिद्धी देतील याची खात्री मला वाटते, असा विश्वासही परेश ठाकूर यांनी व्यक्त केला.

खर्च एमएमआरडीए करणार
ज्या रोहिंजण येथील कामाबाबत ही बातमी संबंधित वृत्तपत्राने छापली आहे त्या कामाचा संपूर्ण खर्च हा एमएमआरडीए करणार आहे. एमएमआरडीए या कामासाठी लागणारा निधी महापालिकेला टप्प्याटप्याने देणार आहे. या निधीचा पहिला टप्पा 16 कोटी रुपये एमएमआरडीएने महापालिकेकडे वर्ग केला आहे. उर्वरित निधी ठरल्याप्रमाणे एमएमआरडीए आवश्यकतेनुसार महापालिकेकडे वर्ग करणार आहे.
आमचा विकासाला विरोध नाही -शेकाप
पनवेलमध्ये शेकापमार्फत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट करण्यात आले की, आमचा विकासाला विरोध नाही, तसेच टेंडर प्रक्रिया ही नेहमी होतच असते आणि त्या प्रक्रियेलाही आमचा विरोध नाही.