मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक नागरिक आपल्या मतांचा अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. या मतदारांची यादी आहे वेळोवेळी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात येत असते.
आताही निवडणूक आयोगाने दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
काय आहे हा कार्यक्रम जाणून घेवू या.... या लेखाद्वारे....
निवडणूक आयोगाने नुकताच दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
*या कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे:-*
*पूर्व-पूनर्रिक्षण उपक्रम -* दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी याचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी, योग्य प्रकारे विभाग/भाग तयार करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे यासाठी कालावधी दि.09 ऑगस्ट 2021 (सोमवार) ते दि. 31 ऑक्टोबर, 2021 (रविवार).
• *पूनर्रिक्षण उपक्रम :-*
एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे दि. 01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि. 01 नोव्हेंबर 2021 (सोमवार) ते दि. 30नोव्हेंबर 2021 (मंगळवार),
• *विशेष मोहिमांचा कालावधी :-*
दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यानी निश्चित केलेले दिवस,दावे व हरकती निकालात काढणे दि. 20 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत,
• *मतदारयादीचे अंतिम प्रसिध्दीकरण:-*
दि. 05जानेवारी, 2022 (बुधवार)
हा पूनर्रिक्षण कार्यक्रम दि. 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम असेल.
हा कार्यक्रम वरील वेळापत्रकानुसार राबवावयाचा आहे. या कार्यक्रमातील विशेष मोहिमांचा कालावधी स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येणार आहे.
मतदारयाद्याच्या प्रारूप प्रसिद्धीसह प्रत्यक्ष मतदार याद्यांच्या पूनर्रिक्षणास प्रारंभ होत असतो. तथापि, मतदारयादी अद्ययावत व शुद्ध होण्याच्या एकमेव हेतूने मतदारयाद्याचे पूनर्रिक्षण प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी पुढीलप्रमाणे पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
दुबार/ समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्य प्रकारे विभाग/भाग तयार करणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे इ. प्रारूप यादी प्रसिध्द करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी या बाबी कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक असते.
• *प्रारूप यादी प्रकाशन :-* तार्किक त्रुटी दूर करण्याशी संबंधित सर्व कामे, मतदारांचे छायाचित्र आणि मानक नसलेल्या EPIC आणि EPIC मालिकेचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतरच प्रारूप यादीचे प्रकाशन केले जाते. प्रारूप यादी तयार करताना विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम 2021 ची अंतिम यादी, निरंतर पूनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुरवणी याद्यांमधील वगळणी केल्या नोंदी वगळून आणि कुटुंबातील मतदार एका ठिकाणी करून या याद्याचे एकत्रिकरण करावे, निरंतर पूनर्रिक्षणांतर्गत केलेली मतदार नोंदणी, वगळणी आणि सुधारणा याबाबत भागनिहाय पुरवण्या तयार करुन त्या भविष्यातील संदर्भासाठी संग्रहित ठेवल्या जातात.
• *दावे व हरकती निकालात काढणे:-*
प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी यांनी विहित नमुन्यात प्राप्त दावे व हरकतींची यादी तयार करावी आणि अशा याद्याची एक प्रत त्याच्या कार्यालयात सूचना फलकावर लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील त्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे आयोगाचे निर्देश आहेत, जेणेकरून सर्व नागरिकांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नोंदविलेल्या दावे आणि हरकतींची माहिती उपलब्ध होऊ शकेल. दावे व हरकतींची यादी सर्व राजकीय पक्षांना माहित करून दिली जाते. दावे व हरकतींची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर किमान सात दिवसांचा कालावधी संपल्यानंतर दावे व हरकती निकाली काढण्यात येतात.
• *पर्यवेक्षक/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे पर्यवेक्षण व तपासणी :-*
भारत निवडणूक आयोगाने पर्यवेक्षक/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे पर्यवेक्षण व तपासणीकरिता पुढीलप्रमाणे कार्यपध्दत निर्धारीत केलेली आहे-------
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेल्या कामापैकी 5 टक्के काम करावे, सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेल्या कामापैकी 1 टक्के काम व या व्यतिरिक्त 10 मतदारांच्या घरोघरी जाऊन तपासणी करावी (असामान्य लिंगप्रमाणे सर्वात जास्त मतदार नोंदणी किंवा वगळणी असलेले पहिले 20 मतदान केंद्र), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सहायक मतदान नोंदणी अधिकारी निकाली काढलेल्या अर्जापैकी 10 टक्के अर्जाची तपासणी करावी, तसेच या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार मतदारांच्या घरोघरी जाऊन तपासणी करावी.
जिल्हा निवडणूक अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी किंवा वगळणी जिल्हयाच्या सरासरीपेक्ष 1 टक्के जास्त आहे किंवा मतदार नोंदणी किंवा वगळणी कोणत्याही विधानसभा मतदार संघापेक्षा 3 टक्के ने जास्त आहे, अशा प्रकरणी तपासणी याबाबतचे सविस्तर समर्थन सादर करतील.
• *अति महत्वांच्या व्यक्तींची नावे चिन्हांकित (FLAGGED) करणे:-* मतदार नोंदणी अधिकारी यांनी सर्व दिव्यांग व्यक्ती आणि मतदार यादीतील खासदार, आमदार यासह कला, पत्रकारिता, क्रीडा, न्यायपालिका व इतर क्षेत्रांतील सन्माननीय व्यक्तींची नावे चुकीने वगळली जाऊ नयेत म्हणून त्यांच्याकरिता डेटा बेसमध्ये योग्य ते चिन्हांकित करण्यात यावे.
• *राजकीय पक्षांबरोबर बैठकी आणि मतदार याद्यांच्या वाटणी :-*
सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांबरोबर बैठका घ्याव्यात आणि त्यांना पूनर्रिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक कळवावे आणि त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य घ्यावे. राजकीय पक्षांनी BLA नेमावेत, यासाठी त्यांना विनंती करण्यात यावी. प्रारूप मतदारयादी आणि अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण संचाच्या प्रती जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना प्रचलित तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यात याव्यात.
• *प्रसिद्धी :-*
जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी SVEEP कार्यक्रमाच्या माध्यमातून संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रमाची पुरेशी प्रसिद्धी करून जागरूकता मोहीम राबविण्यात येते.
राजकीय पक्षांसोबत नियमित कालावधीमध्ये तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर बैठका आणि नियमित पत्रकार परिषद आयोजित करण्यात येतात.
तसेच ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी Voter Helpline Mobile App बाबत महाविद्यालयात, सिनेमागृहात, जाहिरात, केबल टिव्ही इत्यादीमार्फत मोठ्या व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात येते.
• *मतदार यादी अंतिमतः तयार करणे :-*
प्रचलित सूचनानुसार या अंतिम मतदार यादीतील मतदारांच्या कोणताही बदल न करता यादी ही एकत्रित स्वरुपाची असेल. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त प्रमाणे निर्धारीत केलेल्या कार्यक्रमानुसार विहित कालावधीत कार्यवाही करण्याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सूचित केले जाते.
(मनोज शिवाजी सानप)
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग