माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांची ८८ वी जयंती शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी माथाडी भवन, नवीमुंबई याठिकाणी साजरी होणार-मा.आ.नरेंद्र पाटील
नवी मुंबई, दि. 22:- महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक माथाडी कामगारांचे भाग्यविधाते व आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 88 वी जयंती शनिवार दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी माथाडी भवन, नवीमुंबई याठिकाणी कोव्हीड-19 संबंधित नियमावलीनुसार माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्यात साजरी करण्यात येणार असून, या मेळाव्याला पहिल्यांदाच केंद्रीय कामगार मंत्री ना. भुपेंद्रजी यादव उपस्थित रहाणार आहेत. कोव्हीड-19 संबंधित दोन्ही लस घेतलेल्या 100 सभासद कार्यकत्यांच्या उपस्थितीत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना ऑनलाईन मेळाव्यात आदरांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती माथाडी भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.
माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्यास केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, मा. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ, ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, पणन व सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, नवीमुंबईच्या ऐरोली विधानसभेचे आमदार गणेशजी नाईक, बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रसादजी लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदिपजी नाईक आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्यात गुणवंत कामगारांना मान्यवरांच्या हस्ते "माधाडी भुषण" पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली. माथाडी कायदा, विविध माथाडी बोर्डाच्या योजना शासनाकडून स्थापन करुन घेतल्या, माथाडी हॉस्पीटल, माथाडी पतपेढी ग्राहक सोसायटीची स्थापना केली. माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्व प्राप्त करुन देण्याचे महान कार्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केले, मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र सन २०२० पासून कोव्हीड-१९ च्या नियमावलीमुळे ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करुन तमाम माथाडी कामगार आपल्या लाडक्या आराध्यदेवताला आदरांजली अर्पण करीत आहेत.
कोव्हीड-१९ या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहिर केला होता, परंतु माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी नव्यामुंबईतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बाजारपेठा चालू ठेवल्या, गॅस सिलेंड, खते-खाय व इतर मालाच्या ठिकाणी लोडींग, अनलोडींगची कामे केली, त्यात कांही कामगारांना कोरोनाची बाधा झाली तर कांहीचा कोरानामुळे मृत्यू झाला.
केंद्रीय व राज्य सरकारमधील मंत्री महोदय ऑनलाईन मेळाव्यास उपस्थित रहाणार असल्यामुळे कोव्हीड १९ संबंधित नियमावलीचे पालन होण्याकरीता कोव्हीडसंबंधीत दोन लस घेतलेल्या व त्यासंबंधीचे प्रमापत्र असणा-या १०० कामगार कार्यकर्त्यांांना या ऑनलाईन मेळाव्यात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली आहे.
कोव्हीड-१९ संबंधित नियमावलीनुसार ऑनलाईन मेळाव्याव्दारे महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगार व हितचिंतकांना मेळावा पहाण्यासाठीची व्यवस्था देखिल कार्यक्रमाच्या लिंकव्दारे केल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले